18 मार्च रोजी पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये भरणार भव्य शिक्षण परिषद

0
327

प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेस लाभणार शरद पवार यांचे मार्गदर्शन

पनवेल :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने शिक्षण परिषद व भव्य वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.18 मार्च रोजी आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांची उपस्थिती लाभणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण परिषदेला संबोधित करणार आहेत. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माध्यमांना अवगत करण्यासाठी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंबादास वाजे आणि आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राज्य सरचिटणीस बाबासाहेब जगताप, राज्य प्रतिनिधी अविनाश म्हात्रे, म. ज.मोरे मंचावर उपस्थित होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षण परिषदेचे आयोजनाबाबत विस्ताराने प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यात संघटनेच्या निर्मितीमागील उद्देश, संघटना करत असलेले कार्य विशद केले,तसेच राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक संघटना असल्या तरी देखील आमची संघटना या क्षेत्रातील दिग्गजांना शिक्षण परिषदेत बोलावून त्यांच्यासमोर आमच्या समस्या आणि आमच्या मागण्या हिरीरीने मांडत असते असे ते म्हणाले.
सदर शिक्षण परिषदेचे स्वागताध्यक्ष आमदार बाळाराम पाटील हे असून, मार्गदर्शन शिक्षण परिषदेसाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत भाई पाटील, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पनवेल चे महापौर कविता चौतमोल उपस्थित राहणार आहेत.