१७ मार्च रोजी काळा दिन आंदोलन; गुरुवारी रास्ता रोको आंदोलन

0
477

पनवेल :  १७ मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील ९५ गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र काळा दिन पाळणार आहेत. त्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून सकाळी १०. ३० वाजता दास्तान फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सिडकोचा वर्धापन दिन हा प्रकल्पग्रस्त काळादिन म्हणून साजरा करणार असा निर्धार करणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती बरोबरच्या चर्चेत सिडको व्यवस्थापनाने  कुठलेही ठोस आश्वासन न दिल्याने ही चर्चा फीस्कटली आहे. कृती समिती कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी बैठकीतच आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे.सिडको गेली चाळीस वर्षे  प्रलंबित असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर नेहमी उदासीनता दाखवत आली आहे. नवी मुंबई बसवण्यासाठी स्वतःच्या कसत्या जमिनी कवडिमोल भावाने देऊन शंभर टक्के भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा असंतोष खदखदत आहे. गेली दोन पिढ्या आंदोलन करणारे सिडकोपीडित शेतकरी आता करो या मरो च्या भावना व्यक्त करू लागले आहेत. यामुळे सिडको प्रति आपला निषेध व्यक्त करण्यासाठी कृती समितीचे नेतृत्वाखाली १७ मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी काळा दिन आंदोलन करण्याचे ठरवले आहे. जेथून सिडको विरोधात आंदोलनास सुरुवात झाली त्या जासई येथील दास्तान फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना याबाबतचे निवेदन दिल्यानंतर सिडकोच्या वतीने निर्मल भवन मुंबई येथे कृती समिती बरोबर बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबत सिडकोने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करावा,  जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनाविलंब  साडेबारा टक्केचे भूखंड वाटप, गरजेपोटी बांधकामाबाबत झालेल्या शासनाचा निर्णयातील त्रुटी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या याविषयी चर्चा झाली. मात्र सिडकोने विमानतळ नामकरणाचा ठराव देण्यास नकार देत बाकी सर्व मागण्यांवर बैठका करू, लवकर सर्व प्रश्न सोडवू असे नेहमीच्या धाटणीची उत्तरे दिली. यामुळे कृती समिती कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह कृती समितीचे सरचिटणीस भुषण पाटील, नवी मुंबई महानगरपालिका पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत,खजिनदार जे. डी. तांडेल, अतुल दिबा पाटील, नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, राजेश गायकर, सुरेश पाटील, विनोद मात्रे, दीपक पाटील आदींनी आपला १७ मार्चच्या आंदोलनाचा निर्णय ठाम असल्याचे व सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा निर्धार व्यक्त केला.