किल्ले रायगड येथे 15 व 16 एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

0
868

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज यांची दि.16 एप्रिल 2022 रोजी 342 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख पाहुणे म्हणून त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.15 व 16 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-
शुक्रवार दि.15 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 07.00 वा., राजदरबारात सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांच्या मुलाखती व शाहिरी कार्यक्रम “ही रात्र शाहिरांची” तसेच रात्रौ 10.00 वाजता श्री जगदिश्वर मंदिरात “हरिजागर”
शनिवार दि.16 एप्रिल 2022 पहाटे 5.00 वा. श्री जगदिश्वर पूजा, सकाळी 06.00 वा. श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी 08.00 वा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, सकाळी 09.00 वा राजदरबार येथे श्री शिव प्रतिमा पूजन, छत्रपती शिवरायांना आदरांजली, 11.00 वा. छत्रपतींच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक राजदरबार ते श्री शिवसमाधी, दुपारी 12.30 वा. छत्रपतींना मानवंदना त्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री शिव पुण्यस्मृती पुरस्कार या मुख्य पुरस्काराने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ.उदय कुलकर्णी यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच अति विशिष्ट सेवा मेडल व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे वंशज समस्त मालुसरे घराणे यांचादेखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
आतापर्यंत किल्ले रायगडावरील श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात अनेक थोर व्यक्तींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.
तरी छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडूरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांनी केले आहे.