६०० हुन अधिक भक्तांचा वारीत सहभाग
दिघी : महाराष्ट्रातील लाखो वारकार्यांसाठी महत्त्वाची असणारी आषाढी एकादशीमध्ये राज्यातून अनेक वारकरी एकत्र येतात. यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील विठुरायाच्या भक्तांची पायी होणारी दिंडी आज मंगळवारी सकाळी निघाली. यामुळे या पहाटे – पहाटे प्रस्थान सोहळ्यात भक्तिमय सूर अनेक गावांना ऐकू येत होतं.
भरडखोल येथील विठ्ठल रुक्मीनी मंदिर ट्रस्ट व रामचंद्रबुवा वाघे सुखानंद स्वामी, रविंद्र तांडेल, पुरुषोत्तम तांडेल, बळीराम तांडेल, कमलाकर चोगले व हरिचंद्र पावशे यांच्या सहकार्याने या पंढरीच्या चालत होणाऱ्या वारीचा ३७ वर्ष पुर्ण करीत आहे. वारीत लवकर उठावं लागतं, खुप चालावं लागतं अस काही वारीतील अनुभव येत असला तरी आनंदाने या आषाढी वारीला यावेळी मोठ्या संख्येने चिमुकल्यांसह महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला.
वारकरी समुदाय म्हणजे आपलं कुटुंब, मग या कुटुंबासोबत भरडखोल ते पंढरपूर असे ३७० कीमी चे अंतर ६०० हुन अधिक जण पायीप्रवास करत असताना यावेळी कोणीच थकत नाही. असा अनुभव या दिंडीतील प्रत्येक भक्तांकडून मिळत आहे. पुढील २० दिवसात हे अंतर पायी चालतात. आजूबाजूंच्या गावातील विठुरायाचे भक्त मोठया आवडीने यामध्ये सामिल होतात. ऊन पाऊस वारा या सगळ्याचा ते आनंद घेत प्रवास सुरूच ठेवतात. दिंडीत थकवा आला तरीही वारीतील लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांच्या खंडानंतर पायी वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. त्यामुळे हा आषाढी वारी सोहळा यंदा थाटात साजरा होणार, अस मत वारीतील जाणकरांनी व्यक्त केलं.