Home ताज्या बातम्या पनवेलमध्ये अमित ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी
पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्यार्थी सेनेची बांधणी मजबूत करण्यासाठी अध्यक्ष अमित ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी सध्या कोकणात दौऱ्यांचा सपाटा लावला असून ते आज (सोमवार दि.११ जुलै) पनवेल दौऱ्यावर आले होते. यावेळी विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थी सेनेत काम करू इच्छिणाऱ्या प्रवेशकर्त्यांचे अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेत स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
सोमवारी उरण दौरा आटोपून पनवेल येथे आल्यावर अमित ठाकरे यांनी सर्वप्रथम १०० वर्षे जुन्या लिमये वाचनालयास भेट दिली. त्यानंतर लोकनेते दि बा पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन विनम्र अभिवादन केले. त्यापुढे शहरातील जिजाऊ गडास भेट देऊन जेष्ठ नागरिक सभागृहात मनसे विद्यार्थी सेनेच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांशी पुनर्बांधणी संदर्भात चर्चा करून कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या. यावेळी मनसेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेलमधील जेष्ठ नागरीक सभागृहात आल्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थी सेनेचे युनिट बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा सुरू केला आहे. विद्यापिठांतर्गत सिनेट सदस्यांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळकोकणापासून विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीचे काम सुरू आहे. याला युवकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मराठी शाळा, फी वाढ, पालकांचे प्रश्न यासह विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात विद्यार्थी सेनेचे युनिट कार्यरत असेल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी जाणवतील त्याठिकाणी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्वतः जाऊन त्या समस्यांबाबत आढावा घेऊन योग्य मार्ग काढतील अशी ग्वाही यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली.
यावेळी अमित ठाकरे यांनी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिचा सत्कार केला. तसेच उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचाही सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.