करबुडव्या आर्शिया कंपनीवर जप्तीची नामुष्की

0
6736

साईच्या सरपंच अमृता सुनील तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे होत आहे सर्वत्र कौतुक

पनवेल :
गेल्या दशक भरात ग्रामपंचायतीचा कर न भरणाऱ्या मग्रूर अर्शिया वेअर हाऊसच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यामध्ये साई ग्रामपंचायतीला यश प्राप्त झाले आहे.तब्बल ८ कोटी,७५ लाख, एकुणपन्नास हजार रुपयांच्या कर थकबाकीचे प्रकरण या वेअर हाऊस ने सन्माननीय उच्च न्यायालयात नेले होते. उच्च न्यायालयाने कंपनीला फटकारत साई ग्रामपंचायतीचे जप्तीचे आदेश मान्य केले. त्या आदेशानुरूप शुक्रवार दिनांक ८ जुलै रोजी अर्शीया कंपनीच्या दोन कलमार क्रेन,संगणक, टेबल खुर्च्या व अन्य कार्यालयीन साहित्याची जप्ती करण्यात आली आहे.
जप्तीची प्रक्रिया थांबविण्यासाठी अर्शिया प्रशासनाने साम दाम दंड भेद यातील प्रत्येक नीतीचा अवलंब करून बघितला. परंतु सरपंच अमृता सुनील तांडेल यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत बॉडीने कंपनी प्रशासना समोर पराकोटीचा संघर्ष करत असामान्य धैर्याचे उदाहरण प्रस्तुत केले. मित्तल ग्रुपच्या सगळ्या विरोधाला न जुमानता अशाप्रकारे जप्तीची प्रक्रिया करणारी साई ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली असेल. मुजोर प्रशासनाला वठणीवर आणणाऱ्या अमृता सुनील तांडेल व त्यांच्या सहकाऱ्यांवरती स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे.

साई ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आर्शिया नामक खासगी कंपनी(गोदाम) कार्यरत आहे. या कंपनीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ प्रमाणे आकारणी केलेली असून सन २०१२/१३ पासून सन २०२१/२२ पर्यंत मालमत्ता कराची रक्कम रुपये ८३३०४७४५/-,मागील घरपट्टी वरील ५१५ अन्वये दंड रू. ३७४६५६४/- व नोटीस फी ४९८१०९/- अशी एकूण रक्कम रुपये ८,७५,४९,२८/ ग्रामपंचायतीकडे भरणा केलेली नाही. कर व थकबाकी करीता ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ प्रमाणे बिल व रीट नोटीस बजावण्यात आलेले आहेत परंतु आजतागायत कंपनीने मालमत्ता कराचा ग्रामपंचायतीकडे भरणा केलेली नाही.

कंपनीने ग्रामपंचायतीच्या बिलाविरुध्द उच्च न्यायालयात Writ petition no. 2103 (of 2019) दाखल केलेले आहे. तसेच ग्रामपंचायतीने थकबाकी वसूली करणे बाबत कार्यवाही करु नये म्हणून ०६/०३/२०२० रोजी माननिय उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिले होते सदर आदेश दिनांक २०/०३/२०२० पर्यंत होते. परंतु दिनांक २०/०३/२०२० नंतर सदर अंतरीम आदेश चालू नाहीत, असे माननिय उच्च न्यायालयाने दिनांक १६/०६/२०२२ रोजीच्या आदेशान्वये कळविले आहे. त्यामुळे सदरची रक्कम वसुल करणेकामी मुंबई ग्रामपंचायत (येणे असलेल्या रकमा वसुल करण्याबाबत) नियम १९६० मधील नियम ४ अन्वये जप्तीचा हुकुम (वॉरन्ट) बजावण्यात आले. नियम ४ प्रमाणे ग्रामपचायत सचिवाचे स्वाक्षरीने जप्ती हुकूम बजावण्यात आला व नियम ५ व ६ नुसार,कंपनी च्या दोन कलमार क्रेन,संगणक,टेबल,खुर्च्या व अन्य कार्यालयीन साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना साई ग्रामपंचायतीच्या सरपंच अमृता सुनील तांडेल म्हणाल्या की, २७ जून रोजी जप्तीची कारवाई करण्याचे बाबत आम्ही कंपनीला नोटीस दिली होती. परंतु कंपनी प्रशासनाने पुन्हा एकदा सन्माननीय उच्च न्यायालयात धाव घेत वेळकाढू पणाचे धोरण अवलंबले. यावेळी सुनावणीपूर्वी थकीत कराची 25% रक्कम भरण्यास उच्च न्यायालयाने कंपनीला आदेश दिले होते. परंतु पुन्हा एकदा कंपनीने पैसे नसल्याचा कांगावा करत आपला युक्तिवाद केला. यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कंपनीला फटकार लगावत जप्तीचे आदेश कायम ठेवले. त्यानुरूप शुक्रवार दिनांक ८ जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यात आली.
जप्तीच्या कारवाईच्या वेळेस सरपंच अमृता सुनील तांडेल, उपसरपंच हिरामण मोकल, विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे,विस्तार अधिकारी अविनाश घरत, पनवेल पंचायत समिती सदस्य नाना मोरे, ग्रामविकास अधिकारी तथा सचिव बबन राठोड , सुनील तांडेल,अनिल तांडेल,सदस्य अविनाश मोकल, बेबीताई आत्माराम मोकल, अनुसया वाघमारे, स्वाती मोकल, करुणा प्रवीण मोकल, सुजित शंकर पाटील तसेच आकाश मोकल,राजा मोकल,विजय मोकल,संकेत मोकल आदी उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्त मिळण्यास विलंब झाल्यामुळे सकाळी ११ वाजता सुरू होणारी जप्तीची कारवाई साधारणपणे संध्याकाळी चार वाजता सुरू झाली. कारवाई मध्ये बाधा आणण्यासाठी सिक्युरिटी चिफने जंग-जंग पछाडले. जप्तीची कारवाई कव्हर करण्यासाठी आलेल्या जेष्ठ श्रेष्ठ पत्रकारांना आत मध्ये जाण्यापासून मज्जाव देखील करण्यात आला.
जप्तीची कारवाई होऊ नये यासाठी कंपनी प्रशासनाने कंपनीत कामाला असलेल्या ग्रामस्थांना कंपनी बंद होणार असल्याची “आवई” उठवत ग्रामस्थांच्यात भांडण लावून देण्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार देखील करून बघितला.अखेरीस सत्याचा विजय झाला आहे. अशाप्रकारे मुजोर कंपनी प्रशासनाला नामोहरम करण्याची किमया साई ग्रामपंचायतीने करून दाखवली आहे. या स्वरूपाची कारवाई करणारी साई ग्रामपंचायत ही कदाचित जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असेल. सरपंच अमृता सुनील तांडेल व त्यांच्या तमाम सहकार्यांवर, संघर्षमय पद्धतीने कंपनीला झुकवल्याबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे