एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

0
298

         मुंबई : महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर तसेच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नितीन गद्रे, प्रधान सचिव दीपक कपूर, मनीषा म्हैसकर, विकास खारगे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
त्यानंतर मंत्रालयात श्री.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.