नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा,अन्यथा तीव्र आंदोलन – प्रितम म्हात्रे

0
253

पनवेल : नवीन पनवेल सेक्टर 1/S नागरी वस्तीमध्ये मधोमध पनवेल महानगरपालिकेचे कचरा वर्गीकरण केंद्र आहे. या ठिकाणी नवीन पनवेल इतर परिसरातील सर्व कचरा आणला जातो आणि  तिथे कचरा जमा केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यानंतर त्याची विल्हेवाट त्वरीत लावणे आवश्यक आहे पण ते केले जात नाही. सदर कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून त्याच्या मनाप्रमाणे तो कचरा उचलला जातो त्यावर कोणाचेही अंकुश नाही. पनवेल महानगरपालिकेने ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गेली काही वर्षे जनजागृती मोहीम राबविली त्यावर लाखो रुपये नागरिकांचे टॅक्स स्वरूपात आलेले खर्च केले परंतु कंत्राटदाराची ओला आणि सुका कचरा गोळा करण्याची पद्धत पाहता नक्की या कंत्राटामधून कोणाचा फायदा होणार आहे याचा प्रश्न नवीन पनवेलकरांना पडला आहे. नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंड बंद करा,अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.

         सदर प्रक्रिया दरम्यान ज्या वाहनांमधून कचरा आणला जातो ती वाहने सुस्थितीत नसल्याचेही आढळून आले आहे. काही वाहनेही सडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा त्यांमधून कचरा गोळा केला जातो. सदर वाहने ही नियमाप्रमाणे संपूर्ण पॅक पाहिजेत परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. पनवेल महानगरपालिकेने ठेकेदाराला संबंधित विषयात नोटीस काढून सर्व गाड्यांचे ऑडिट करावे अशी मागणी प्रितम म्हात्रे यांनी केली आहे. रस्त्यांमधून प्रवास करत असताना बऱ्याच वेळा कचरा हा रस्त्यावर पडला जातो त्यावरून दुचाकी स्वार पडल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. या कचऱ्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बरीच वाहने ही जुनी झाल्यामुळे कंत्राटदाराने सदर प्लॉटवर सडलेल्या परिस्थितीमध्ये टाकून दिलेले आहेत ज्यामुळे त्या प्लॉटचा दुरुपयोग सुद्धा होत आहे. तसेच त्या भूखंडातील परिसरात ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे ज्यामध्ये डेंग्यूचे मच्छर वाढून संपूर्ण परिसरामध्ये डेंग्यूचा फैलाव होण्यास त्यामुळे मदत होत आहे. अतिक्रमण विभागामधून उचलले गेलेले बरेचसे सामान या भूखंडावर पसरलेले आहे ज्यामध्ये उंदीर आणि घुशी यांचा उपद्रव वाढला आहे. अशाप्रकारे अनेक प्रकारच्या समस्या त्या भूखंडावर आहेत. त्याचे दुष्परिणाम त्या भूखंडाच्या चारही बाजूने राहणाऱ्या लोकवस्ती मधील नागरिकांना होत आहेत.

      पनवेल महानगरपालिकेला हजारो रुपयांचा टॅक्स भरून नागरिकांना अशा प्रकारच्या गलिच्छ वातावरणात राहावे लागत आहे अशी खंत तेथील जेष्ठ नागरिकांनी बोलून दाखवली.यावेळी शेकापचे प्रभाकर कांबळे, बबन विश्व्कर्मा, रमाकांत गरुडे यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.