माथेरान : सलग चार दिवसांपासून माथेरान मध्ये वरुणराजा मनसोक्तपणे पर्जन्यवृष्टी करत असल्याने या वर्षाऋतु मध्ये केवळ मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हौशी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. चार दिवस पावसाचे सातत्य असल्याने रस्ते धुवून चकाचक निघाले आहेत.तर काही ठिकाणी गटारांची सुयोग्य पध्दतीने साफसफाई न झाल्यामुळे गटारे तुंबलेली आहेत त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे.
आपत्ती व्यवस्थापन चोख कामगिरी करत असून या पर्जन्यवृष्टी मुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झालेली असून प्रशासन योग्य ती काळजी घेत आहेत. बाजारपेठा मध्ये काही प्रमाणात शुकशुकाट दिसत असून पॉईंट्स भागात निसर्गाचे नयनरम्य रूप न्याहाळण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसत असून गरमागरम भजी,वडापाव,मका कणीस, चहाचा आस्वाद घेत आहेत. आबालवृद्ध पर्यटक हातरीक्षा मधून तर हौशी पर्यटक घोड्यावर बसून पॉईंट्स कडे सवारी करत आहेत.