रायगड जिल्ह्यात गणपती उत्सवाची धूम;प्रशासनाची जोरदार तयारी

0
10

अलिबाग :
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून, जिल्ह्यात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण जाले आहे. नाक्यानाक्यावर उत्सवाची चर्चा आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्त सज्ज होत आहेत. २७ ऑगस्टरोजी जिल्ह्यात १ लाख २ हजार ४८४ गणपतीमूर्तींची स्थापना करण्यात येणार असून, मूर्तीकारांची लगबग सुरु आहे. जिल्ह्यात उत्सव काळावधीत कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. बाप्पाच्या सजावटीचे साहित्य तसेच पूजेचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील गणपती उत्सवाचीच धूम असल्याचे चित्र दिसून येते.
जिल्ह्यात १ लाख २ हजार ४८४ गणपती मूर्तींची प्रतिष्ठापणा
२७ ऑगस्टपासून गणपतीउत्सव साजरा करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात घराघरात गणपती उत्सव साजरा करण्यात येणार असून, जिल्ह्यात १ लाख २ हजार ४८४ गणपती मूर्तींची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यामध्ये १ लाख २ हजार १९८ खासगी तर २८६ सार्वजनीक गणपती मूर्तींचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी नागरिकांनी घरामध्ये रंगरंगोटी केली असून, गणपतीसाठी मखरे तयार करण्यात भक्त व्यस्त आहेत. तसेच नाक्या-नाक्यावर गणेशोत्सवाचीच चर्चा सुरु आहे
मूर्तीकारांची लगबग
गणेशोत्सव जवळ आल्याने काही गणेशभक्त गणपती मूर्ती आपापल्या घरी गेऊन जाऊ लागले आहेत. तर बहुतांश गणेशभक्त रविवार (दि.२४) पासून गणपती मूर्ती आपल्या घरी घेऊन जातील. काही गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये गणपती मूर्तींचे काम सुरु आहे. झिंग, हिरे तसेच इतर साहित्याने मूर्ती सजविण्यात येत आहेत. वेळेत मूर्ती सजविण्याचे काम पूर्ण करण्यासाठी कारखान्यांमध्ये दिवस-रात्र तास काम सुरु आहे.
प्रशासन सज्ज
गणोशोत्सव शांततेत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्ह्यात जनावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या कालावधीत मोर्चे, निदर्शने तसेच ज्वलंत पदार्थ व हत्यारे जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्सव काळावधीत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नागरिकांना तात्पुरते स्वरुपात तडीपार करण्यात येत आहे. तसेच यापूर्वीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागाने बैठका घेतल्या असून, त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याबरोबरच, नेहमीच्या गस्तीतही वाढ करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दल तसेच होमगार्डची मदत घेतली जाणार आहे.
बाजारात गर्दी
गणपती बाप्पाच्या सजावटीचे साहित्य तसेच पूजेचे साहित्या विकत घेण्यासाठी बाजारपेठेत भक्तांची गर्दी होत आहे. मखरे, सिंहासणांना भक्तांची पहिली पसंती मिळत आहे. तसेच सजावटीसाठी विविध प्रकारच्या दिपमाळा भक्तांच्या पसंतीस उतरत आहेत. याव्यतिरिक्त अगरबत्ती, कापूर, धूप यासह इतर पूजेचे साहित्य विकत घेण्याकडे भक्तांचा कल आहे.
सोशल नेटवर्किंग साईटवर उत्सवाची धूम
सोशल साईटवरही गणेशोत्सवाची धूम आहे. वॉट्स अ‍ॅप, फेसबुक या साईटवर एकमेकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच, गणपती मूर्ती कशी असावी, उत्सव कशाप्रकारे साजरा करण्यात यावा ही माहिती एकमेकांना पाठविण्यात नेटकरी पुढे आहेत. तसेच उत्सवाचे संदेश देण्याबरोबरच, आरती संग्रहाचे पुस्तकही पाठविण्यात येत आहे. नेटकर्‍यांनी आपला डी.पी.वर गणपतीमूर्तीचा फोटो ठेवला आहे. तसेच आपल्या घरात प्रतिष्ठापणा करण्यात येणार्‍या गणपतीची मूर्ती सोशल नेटवर्किंग साईटवर पाठविण्यात येत आहे.