गणेशोत्सव दोन दिवसांवर, बाजारपेठा गजबजल्या, कोकणावासी परतू लागल्याने गावाकडील घरांचे दरवाजे उघडले

0
3

कोकणात गणेशोत्सवाचा जल्लोष अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात हा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. म्हसळ्यातील बाजारपेठा सध्या गजबजल्या असून गणेशमूर्तीपासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत, मिठाईपासून ते ढोलकीच्या साहित्यापर्यंत मोठी मागणी वाढू लागली आहे.
गावागावांत मातीच्या, शाडूच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तिची विक्री सुरू झाली असून कारागिरांना यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक मूर्तीनाही नागरिकांची पसंती लाभत आहे. सजावटीच्या वस्तू, रंगीबेरंगी रोषणाई, तोरणं, कागदी पुलांची सजावट, तसेच पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मिठाईचे दुकानं, खासकरून मोदक विक्री दुकानावर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमधून कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी परतण्यास सुरुवात केलीआहे. एस.टी. बसस्थानकांवर स्थानकांवर गर्दी वाढली आहे. खासगी वाहनांच्या वाहतुकीतही वाढ झाली असून प्रमुख महामार्गावर पोलीस निरीक्षक संदिप कहाले यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत पार पड़ावा यासाठी आवश्यक ती तयारी सुरू आहे.
सार्वजनिक मंडळांच्या मंडपांना परवानग्या, विद्युत सुरक्षितता तपासणी, वाहतूक नियंत्रण, आरोग्यविषयक सुविधा या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पोलिस विभागाने सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून कोकणवासीयांच्या भावविश्वाशी जोडलेला सांस्कृतिक सोहळा आहे. घराघरांतून गणपती बाप्पाचे स्वागत करण्याची लगबग सुरू असताना, पुढील काही दिवसांत हा उत्साह शिगेला पोहोचणार यात शंका नाही.वर्षभर खेड्यापाड्यातील घरे बंद असतात परंतू गणपती असा सण आहे कि खेड्यातील सर्वच्या सर्व कोकणवासीय आपापल्या गावी पोचतात आणि गावागावात नवचैतन्य तयार होते.