Home ठळक बातम्या पेट्रोल-डिझेल विक्रीवरील निर्बंधात अंशतः बदल सुधारित आदेश जारी

रायगड – अलिबाग : समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्याबाबत प्रसारित झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने १ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोल-डिझेल विक्रीसंदर्भात निर्बंध लागू केले होते.
सद्यस्थितीत जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पुरवठा पूर्ववत सुरळीत झाल्याचे दिसून येत असून, विविध कंपन्या, व्यावसायिक, संघटना व सहकारी संस्थांकडून डिझेल पुरवठ्याबाबत मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वीच्या आदेशात अंशतः बदल करून सुधारित आदेश जारी केले आहेत.
सुधारित आदेशानुसार, डिझेल पंप चालकांनी डिझेलची विक्री पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी. मात्र, कोणत्याही कंपनीकडून किंवा व्यक्तीकडून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात डिझेल उचल होत नाही याची खात्री करावी आणि वाहनांव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या नोंदी अद्यावत ठेवाव्यात.
तसेच, पेट्रोलची विक्री केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल खुले स्वरूपात (कॅन, बाटली, डबा इ.) विक्री अथवा पुरवठा करू नये. मात्र, स्पीड बोटसाठी आवश्यक असलेले पेट्रोल संबंधित बोट लायसन्स धारकांनाच देण्याची मुभा देण्यात आली आहे.
याशिवाय, सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे बंधनकारक असून विक्री नोंदी नियमित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत साठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हा आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात आले असून सर्व संबंधितांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.