खेळण्यातील शक्तिशाली चुंबकांनी चिमुरड्याच्या आतड्याला पाडली छिद्रे

0
15

कोलाड : 
पोटाचा संसर्ग झाल्याचे वाटत असलेल्या दोन वर्षांच्या मुलाची प्रकृती अचानक गंभीर झाली. मुलाने खेळण्यातील दोन छोटे चुंबक वेगवेगळ्या वेळी गिळले होते. हे दोन्ही चुंबक आतड्यांमध्ये एकमेकांना आकर्षित होऊन अडकले. त्यामुळे आतड्यांना छिद्रे पडून मुलावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली.तर डॉ सतेज शंकराव म्हसकर यांनी तातडीने त्या चिमुकल्यावर उत्तमरीत्या शस्त्रक्रिया करून त्या चिमुकल्यांचे प्राण वाचवले
मुलाला सुरुवातीला अधूनमधून पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे सुरुवातीला गॅस्ट्रोएन्टेरायटिसचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, वेदना तीव्र झाल्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड तपासणी केली. त्यामध्ये अपेंडिसायटिसची शक्यता दिसून आल्याने मुलाला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
मुलाच्या पोटावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना आतड्यांमध्ये दोन चुंबक अडकलेले आढळले. सर्जन डॉ. सतेज शंकरराव म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेदरम्यान पोटात मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य द्रव आढळला. तो बाहेर काढताना अचानक दोन चुंबक मेटल सक्शन कॅथेटरला चिकटले. त्यानंतर डॉक्टरांना मुलाने चुंबक वेगवेगळ्या वेळी गिळल्याचे लक्षात आले.
हे दोन्ही चुंबक आतड्यांच्या दोन भागांना एकमेकांकडे खेचत होते. त्यामुळे आतड्याच्या भिंतीवर दबाव निर्माण होऊन दोन ठिकाणी छिद्रे पडली होती. त्यातील एक छिद्र लहान आतड्यात, तर दुसरे मोठ्या आतड्याचा भाग असलेल्या सीकममध्ये होते.
डॉक्टरांनी दोन्ही छिद्रे शस्त्रक्रियेद्वारे दुरुस्त केली. तसेच पोटातील दूषित भाग स्वच्छ करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती सुधारली आणि आठवडाभराने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
या घटनेचा उलगडा शस्त्रक्रियेनंतर झाला. मुलाच्या पालकांना घरी त्याच प्रकारचे चुंबक असलेले एक खेळणे आढळले. त्यांनी ते डॉ.सतेज म्हसकर यांना दाखवले. त्यातून मुलाने गिळलेल्या चुंबकांचा स्रोत स्पष्ट झाला.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, हे चुंबक निओडिमियम या अत्यंत शक्तिशाली धातूपासून बनलेले होते. अशा चुंबकांचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर्स, स्मार्टफोन, हेडफोन, एमआरआय स्कॅनर आणि कॉम्प्युटर हार्ड ड्राइव्हमध्येही केला जातो.
“ही चुंबके आकाराने छोटी असली तरी त्यांची चुंबकीय शक्ती सामान्य चुंबकांपेक्षा पाच ते तीस पट अधिक असू शकते,” असे डॉ.म्हसकर यांनी सांगितले.
अशा शक्तिशाली चुंबकांमुळे लहान मुलांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही चुंबके अनेकदा प्लास्टिकच्या खेळण्यांमध्ये लपवलेली असतात आणि खेळणे तुटल्यास ती सहज बाहेर पडू शकतात.

पालकांनी लहान मुलांना अशा चुंबकीय खेळण्यांपासून दूर ठेवावे आणि खेळण्यांमध्ये छोटे चुंबक सुटलेले नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, तसेच खेळण्यासाठी देण्यात आलेले खेळीनी याची खात्री करून ती योग्य असणारी खेळणी बालकांना द्यावी असे आवाहन पालक वर्गासाठी हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.सतेज शंकरराव म्हसकर यांनी केले आहे.