निसर्गाचा अद्भुत चमत्कार गरम पाण्याचे कुंड लाभलेले उन्हेरे गाव

409
1213

राजकीय, सामाजिक व स्वातंत्र्य चळवळी व नैसर्गिक घटनांचा साक्षीदार

पाली/बेणसे : सुधागड तालुक्यातील पर्यटनस्थळे , धार्मिक स्थळे जगभरात प्रसिद्ध आहेत. उन्हेरे गावाला निसर्गाचा अद्भुत चमत्कार लाभला आहे. येथील गरम पाण्याच्या कुंडांमुळे हे गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. तसेच येथे राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य चळवळीच्या महत्वाच्या घटना देखील घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यातील उन्हेरे व महाड येथील सव  येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यातील उन्हेरे येथील कुंडांना पर्यटक व नागरिकांची सर्वाधिक अधिक पसंत आहे. कारण या कुंडातील पाणी आंघोळीसाठी योग्य आणि स्वच्छ आहे. अंबा नदीच्या शेजारी निसर्गाने समृद्ध अशा ठिकाणी हे गरम पाण्याचे कुंड आहेत. उन्हेर कुंड परिसरात प्रसिद्ध विठ्ठल रखमाई मंदिर देखील आहे. तेथे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी पासून पंधरा दिवस यात्रा भरते. सुक्या मासळीसाठी ही यात्रा प्रसिद्ध असून खास सुकी मासळी खरेदी करण्यासाठी हजारो भाविक व लोक येतात. आणि कुंडावर यथेच्छ स्थान देखील करतात.  पालीपासून अडीच ते तीन किमी अंतरावर उन्हेरे गरम पाण्याचे कुंड आहेत. श्रीरामाने बाण मारून स्नानासाठी सीतामाईंना हे स्नान कुंड तयार करून दिली अशी याबाबतची पुराण कथा सांगितली जाते. उन्हेरे कुंडावर एकुण तीन कुंड आहेत. त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे तर उर्वरित दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. यापैकी थंड पाण्याचे व त्याच्या शेजारी असलेले गरम पाण्याचे कुंड उघड्यावर असून आकाराने लहान आहेत. येथील पाणी दुसऱ्या कुंडापेक्षा अधिक गरम आहे. तसेच हे कुंड खोल आहे. या कुंडात मधल्या भागात 1.5 मीटर उंचीचा चौकोनी खड्डा आहे. येथे लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. आणि यातून सतत गरम पाणी येत राहते. या कुंडाच्या शेजारी लागूनच थंड पाण्याचे कुंड आहे.  तर तिसरे गरम पाण्याचे कुंड मोठे असुन बंदिस्त आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी दोन भाग केले आहेत. त्यांना खाली लाकडी फळ्या बसविण्यात आल्या आहेत.  या फळ्यांच्या मधल्या अंतरातून गरम पाण्याचे बुडबुडे सतत येत राहिल्याने पाण्याची पातळी व गरमपणा कायम टिकून राहतो. उन्हेरे गावाजवळील या गंधक मिश्रित या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे व वाताची विकार बरे होतात. येथे स्नान केल्यास ताजेतवाने वाटते. कामाचा व प्रवासाचा क्षीण देखील नाहीसा होतो. त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये कुंडांवर स्नानासाठी लोक आलेली असतात. अशा ठिकाणी आढळणारे गरम पाणी हे भूगर्भातील हालचालींमुळे होत असते. लाव्हा रसाच्या उष्णतेमुळे भूगर्भातील खडक तप्त होतात व त्यांच्या संपर्कातील पाण्याचा साठाही गरम होतो. या जोडीलाच येथील भूगर्भात खनिजाच्या स्वरूपात असणारे क्षाररुपी गंधक झऱ्याच्या पाण्यात विरघळल्याने पाण्याचे तापमान वाढते आणि तेवर आल्यास त्यास गरम पाण्याचे झरे म्हणतात. उन्हेरे कुंडाचा परिसर अनेक सामाजिक-राजकीय चळवळींचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कुंडाजवळ मो. कृ. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. इतरही अनेक परिषदा काँग्रेसची शिबिरे व सभा या स्थानावर झाल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना मदत करू नये असे प्रचाराचे भाषण बापूसाहेब लिमये यांनी येथे करून कायदे भंग केल्याने त्यांना शिक्षा झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही वर्षापुर्वी या कुंडाच्या भोवती टाईल्स लावुन रंगरंगोटी करण्यात आली आहे.  सुधागड तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालणा देणारे उन्हेरे कुंड आहेत. या परिसराच्या (क्षेत्राचा) विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध झाल्यास मोठ्याप्रमाणात रोजगार व पर्यटन विकास घडू शकेल.