प्रितम म्हात्रे यांनी वडाळे तलाव विसर्जन घाटाची केली पाहणी

0
137

विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार

पनवेल:

      गणेशोत्सवाला अवघे ३ ते ४ दिवस उरले आहेत. यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी शहरातील वडाळे तलावाची पाहणी केली. यादरम्यान गणेश विसर्जनाच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तवला जात असल्याने विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षितता व खबरदारीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

          वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पूर्णत्वास आले आहे. याठिकाणी दरवर्षी गणेश विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते.

तलाव परिसराचे सुशोभीकरण झाल्याने दोन ठिकाणांहून प्रवेशद्वार दिसून येते आले आहेत. त्यामुळे नेमके विसर्जन कुठे करावे याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विसर्जन घाटावर गणेश विसर्जनासाठी प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले. व्ही के हायस्कुल येथील शितलामाता मंदिरासमोरून विसर्जनासाठी प्रवेशद्वार ठेवण्यात आले असून तलाव परिसरातील इतर प्रवेशद्वारे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यादरम्यान पालिकेचे दहा प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यांची अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

       पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांपैकी गणपतीसोबत केवळ चार जणांना परवानगी देण्यात आली असल्याने गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले. विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांचे टेम्परेचर चेकिंग तसेच गरज भासल्यास अँटीजन चाचणी करण्यासाठी आरोग्य सेविकाही विसर्जन घाटावर उपस्थित राहावे अशी मागणीही करण्यात आली. याबरोबरच विसर्जन घाट परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली व सविस्तर माहितीचे फलक येत्या १-२ दिवसांत लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

         पनवेल महापालिका क्षेत्रात ६४ ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते. यामुळे या सर्व आवश्यक असलेल्या गोष्टी इतर ठिकाणी असलेल्या विसर्जन घाटावर देखील लागू पडतात अशा सूचनाही पनवेल महापालिकेला देण्यात आल्या आहेत. यासाठी त्या  ठिकाणच्या आवश्यकत्यानुसार पालिकेचे कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे आहे. पालिकेला स्वयंसेवकांसाठी मनुष्यबळ अपुरे पडल्यास आम्ही देखील सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया प्रितम म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.