तळीये येथील बाधित बारा कुटुंबांना तात्पुरत्या निवासासाठी आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते कंटेनर सुपूर्द

0
150

अलिबाग :   महाड तालुक्यातील तळीये येथील दरड कोसळल्यामुळे बाधित झालेल्या 12 कुटुंबांना  तात्पुरत्या निवासाकरिता काल (दि.9 सप्टेंबर) रोजी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते कंटेनर सुपूर्द करण्यात आले.

       हे कंटेनर मिळण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रयत्नातून नार्डेको कंपनी व मुंबईतील बिल्डर असोसिएशनमार्फत पुरविण्यात आले आहेत.

      या कंटेनरमध्ये किचन प्लॅटफॉर्म, टेबल व शौचालयाची सुविधा देण्यात आली आहे.

      येथे पाणीपुरवठा व कंटेनर उभे करण्यासाठी प्लॅटफॅार्म बनविण्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम व पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले.

      हे तात्पुरते कंटेनर श्री.सुगंधचंद पोखरमल अग्रवाल यांनी तर योगीराज त्रिंबक चौधरी, सुंदराबाई भगवती माने, लक्ष्माबाई पांडुरंग माने, कृष्णाबाई गणपत पांडे या जमीन मालकांनी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित 12 कंटेनर लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याचे  कामही प्रगतीपथावर आहे.

       यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळिजकर, पंचायत समिती सभापती श्रीम.सपना मालुसरे, तहसिलदार श्री.सुरेश काशीद, सरपंच श्री.संपत तांदळेकर, उपसरपंच श्री. महेंद्र म्हस्के, मंडळ अधिकारी श्री.जी.जी.पवार, तलाठी श्री.जगदिश शिंदे, ग्रामसेवक श्री.प्रविण शिंदे व तळीये ग्रामस्थ  उपस्थित होते.