कंपनीच्या प्रगतीचा फायदा कामगारांना झाला पाहिजे – प्रकाश म्हात्रे

0
167

पनवेल :  दिपक फर्टिलायझर्स एम्प्लॉईज युनियनच्या झालेल्या निवडणूकीत सरचिटणीसपदी प्रकाश म्हात्रे हे निवडून आले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत युनियनच्या उपाध्यक्षपदी रविंद्र गोरपेकर, खजिनदारपदी अ‍ॅड. विनायक मुंबईकर, सहसचिवपदी रविंद्र शेळके, हरेश थोरात, सदस्यपदी जितेंद्र पाटील, अर्जुन पाटील, अनंतराव पोखरकर, मनोज कुंभारकर, दत्तात्रेय शेडगे, दिपक डाऊर, संजय भगत, संगम म्हात्रे हे चुरशीच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत. दिपक फर्टिलायझर्स एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सचिनभाऊ आहिर आहे.
दिपक फर्टिलायझर्समध्ये गेली साडेतीन वर्षे कामगारांची निवडणूक झाली नव्हती. आठ-दहा वर्षापूर्वी झालेल्या संपामुळे कामगारांमध्ये भितीचे वातावरण होते. संप झाला म्हणून कंपनी व्यवस्थापनाचा कामगारांवर दबाव होता. असे असले तरी आता झालेली ही निवडणूक अगदी खुल्या वातावरणामध्ये पार पडली. युनियनच्या कार्यकारीणीमध्ये सर्व तरूण सदस्य असल्याने कंपनीच्या उन्नतीसाठी हातात हात घालून ही युनियन काम करणार आहे. कंपनीकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत. कंपनीच्या प्रगतीचा फायदा कामगारांना झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे दिपक फर्टिलायझर्स एम्प्लॉईज युनियन सरचिटणीस प्रकाश म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.