न्यायाधीश, वकील, पोलीस, प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांचा सहभाग
पनवेल: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आणि गांधी जयंतनिमित्त विधी सेवा समिती पनवेल आणि वकील संघ पनवेल यांच्यावतीने पनवेल मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये न्यायाधीश, वकील, सामाजिक संस्था आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. समाजातील वंचित घटकांपर्यंत न्याय पोहोचणे हे यामागचे उद्दिष्ट होते. आज (शनिवार दि.२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता जिल्हा न्यायालय, पनवेल येथे महात्मा गांधी जयंती निमित्त प्रतिमचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायलय, मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२ ऑक्टोबर ते दि.१४ ऑक्टोबर या काळात पॅन इंडिया अवेरनेस चे आयोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती पनवेल व पनवेल बार असोसिएशन तर्फे शनिवारी (दि. २ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंती निमित्त सकाळी ९ वाजता जिल्हा न्यायालय पनवेल येथून विधी सेवा प्राधिकरणाबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालय, पनवेल पासून बाईक रॅली सुरु होवून सावरकर चौक ते गावदेवी मंदीराकडून कापड बाजार मार्गे जुने तहसिल- महानगरपालिका कॉम्प्लेक्स येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचरत्न हॉटेल चौक वरुन टपालनाका पासून मोहल्ला मार्गे महानगरपालिका कार्यालय येथून पनवेल उपजिल्हा रुग्णालय मार्गे पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथून जिल्हा न्यायालय पनवेल येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी सदर जनजागृती बाईक रॅलीमध्ये जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जिल्हा न्यायालय आर. जी. अस्मर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पनवेल रावसाहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पनवेल आर एस भाकरे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पनवेल ए एम मुजावर तसेच सर्व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ व कनिष्ठ स्तर पनवेल व वकीलवर्ग तसेच पोलीस प्रशासनासह सर्व प्रशासकीय यंत्रणा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यासह पनवेल बार संघटनेचे अध्यक्ष ऍड.मनोज भुजबळ व कार्यकारिणी वकीलवर्ग, पंचायत समिती कार्यालय पनवेल, तहसीलदार कार्यालय पनवेल, इन्फिनिटी फाउंडेशन, ऑकर इंडिया, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, अॅमिटी लॉ स्कूल पनवेल, केएलई लॉ कॉलेज कळंबोली, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज तळोजा तसेच विल्फ्रेड लॉ कॉलेज पनवेल येथील विद्यार्थी यांनी देखील सदर रॅलीमध्ये सहभाग घेतला.
विधी सेवा समितीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ‘न्याय सगळ्यांसाठी’ याअंतर्गत दीड महिना विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात समाजातील वंचित घटकांना मोफत विधी सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये कायदेशीर सहाय्यकांचे पॅनल कार्यरत असून नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना वकील देण्यात येईल. यामध्ये वकील पुर्णपणे मदत करणार असून सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यात येणार आहे. ज्या वंचित घटकांना पैशांअभावी न्यायालयात खटला मांडता येत नसेल त्यांना मोफत सेवा दिली जाणार आहे.
– आर जी अस्मर ( जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जिल्हा न्यायालय)
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्यायदान ही व्यवस्था पोहोचली पाहिजे. आपली लोकशाही किती बळकट आहे हे लोकांना कळण्यासाठी कायद्याची परिपूर्ण माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी शासन, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट यांच्यामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी व सेवा पुरवण्यासाठी विधी सेवा समिती कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी हे प्रयोजन करण्यात आले आहे.
– अॅड मनोज भुजबळ (अध्यक्ष, पनवेल बार संघटना)