Home ताज्या बातम्या स्थानिक ठेकेदारांच्या थकीत बिलासाठी अदानी पोर्टच्या आगरदांडा टर्मिनलचे काम बंद
कोर्लई : आगरदांडा येथे सुरू असलेल्या अदानी पोर्टला व त्यांच्या कोणत्याही कामाला आमचा विरोध नाही तर तत्कालीन दिघी-पोर्ट आगरदांडा टर्मिनलवर संचालक विजय कलंत्री यांच्या डीबीएम,डीपीएल कंपनीने थकविलेली स्थानिकांची बिलं मिळावी. याकरीता अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्थानिकांच्या न्याय-हक्का साठी अदानी पोर्ट प्रशासनाकडे चर्चा करून मुंबई येथे गेल्या एक दीड महिने अगोदर त्यांच्या समवेत मिटिंगचे आयोजन करून चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी स्थानिक कार्यकर्ते,स्थानिक पोट ठेकेदारही उपस्थित होते. दिघी-राजपुरी बंदराच्या खाडीवर दिघी-पोर्ट विकसित होत असतांना या अगोदर स्थानिक लोकांनी केलेल्या कामांचे पैसे त्यांची बिलं न मिळाल्याने अनेक वेळा काम बंद आंदोलनं झाली आहेत.
दिघी-पोर्ट अदानी ग्रुप कडे हस्तांतरित झाल्या नंतर स्थानिकांच्या जुन्या थकीत बिलां विषयी अदानी ग्रुप प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते,पोट ठेकेदार व आमदार महेंद्र दळवी यांच्या थकीत बिलां विषयी चर्चा झाली होती. त्यावेळी थकीत बिलं देण्याचे वचन देऊन ते वचन न पाळता स्थानिक ठेकेदारांना तुटपुंजी रक्कम पुढे करून आपलं काम बाहेरच्या ठेकेदारांच्या मदतीने चालू केलं. अदानी पोर्टनी दिलेलं वचन पाळलं नाही. जिथं पर्यंत स्थानिकांची थकीत बिलं देत नाहीत तिथ पर्यंत काम बंद करा. असे गणेशोत्सवा दरम्यान मतदार संघाच्या दौऱ्यावर असतांना आमदार दळवी यांनी प्रत्यक्ष सांगितले त्यावेळी त्यांच्या समवेत स्वत: व शिवसेना मुरुड उप-तालुका प्रमुख मनोज कमाने, महिला संघटक शुभांगी करडे, मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, आगरदांडा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच रुषाली डोंगरीकर व सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते. केवळ आमच्या स्थानिक ठेकेदारांची थकीत बिलं मिळावीत,आमचा पोर्टच्या कामात आताही सहकार्य आहे. पुढेही राहील.असे शिवसेना मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दिघी-पोर्ट संचालक विजय कलंत्री सुरवाती पासूनच झालेल्या कामात डीबीएम,डीपीएल कंपनीने स्थानिकांना कामं दिली होती. सुरवातीच्या काळात सर्व काही सुरळीत होतं. मात्र पहिल्या टप्प्यातील शेवटच्या काळात अनेक स्थानिक ठेकेदारांची बिलं मिळाली नाहीत. हळू हळू दिघी-पोर्टचं कामही मंदावलं त्या कारणाने स्थानिक ठेकेदार अडचणीत आले. आता दिघी-पोर्टचा ताबा घेणारे अदानी ग्रुपने ती थकीत बिलं देण्याचे वचन देऊन तुटपुंजी रक्कमेवरच थांबवून कामं चालू केली आणि म्हणून जिथं पर्यंत थकीत बिलं देत नाहीत.तिथं पर्यंत काम थांबवा. असे अदानी ग्रुप पोर्ट प्रशासनाला सांगितलं होतं. वास्तविक सर्व स्थानिकांनी सहभागी होऊन आपापली बिलं,कामं होई पर्यंत सहकार्य करायला हवं. या व्यतिरिक्त इतर कोणतंही स्वार्थ नाही असे स्थानिक ठेकेदारांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.