लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन

0
117

पनवेल : पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका लीना गरड यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर खारघर प्रभाग पाच मधून नगरसेविका म्हणून लीना गरड विजयी झाल्या. मात्र त्यांनी सतत उघडपणे पक्षविरोधी कारवाई केली आहे आणि तशा सातत्याने तक्रारी विभागातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षश्रेष्टींकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी लीना गरड यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या संदर्भात आज (दि. १६) निलंबन पत्र लीना गरड यांना पाठविण्यात आले आहे.
भाजपच्या नगरसेविका असतानाही लीना गरड यांनी महापालिकेच्या विविध सभांमध्ये विरोधी पक्षाला उघडपणे सहकार्य केले आहे. भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या असताना आपल्या स्वतःच्या खारघर फोरम या संस्थेला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भाजपाला सातत्याने कमी लेखत भारतीय जनता पार्टीच्या शहरी व ग्रामिण कार्यकर्ते यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न लीना गरड यांनी सातत्याने केला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्य न वाढवता खारघर, कामोठे या ठिकाणी समाजामध्ये फूट पडेल असा ठराविक अजेंडा राबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शहरात बॅनरबाजी करणे, तसेच पक्षाच्या विरोधात पत्रके काढून जनतेची दिशाभूल करणे, सोशल मिडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधात टीका- टिप्पणी करणे,  महासभेच्या वेळी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसून सत्ताधारी पक्षाविरोधात निदर्शने करणे, अशा अनेक पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम लीना गरड यांनी केले, त्यामुळे पक्षाकडून वारंवार समज तसेच चर्चेस बोलावून सुद्धा लीना गरड यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही या उलट पक्षाची बदनामी करण्याचा सातत्याने त्या प्रयत्न करीत आल्या आहेत, त्यामुळे बेशिस्त वर्तनामुळे तसेच पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाला या संदर्भात कारवाई करण्यास भाग पडले आहे, त्यानुसार लीना गरड यांचे भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले.