माथेरान : माथेरान मध्ये पावसाळ्यात मोठया प्रमाणावर होत असलेल्या पर्जन्यवृष्टी मुळे होणारी मातीची धूप थांबविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून सर्वत्रच क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात येत आहेत. परंतु ह्या रस्त्यावरून घोडे घसरून पडतात यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी तक्रार येथील मूळवासीय अश्वपाल यांनी एमएमआरडीए कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती.त्यानुसार ही बाब लक्षात घेऊन अमन लॉज रेल्वे स्टेशन जवळील काळोखीचा भाग समजल्या जाणाऱ्या अति चढावाच्या भागातील पूर्ण केलेल्या रस्त्याचे ब्लॉक काढण्यास सुरुवात झाली आहे. गावातील बहुतांश पॉईंट भागात सुध्दा आगामी काळात अशाप्रकारे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यासाठी नगरपरिषद एमएमआरडीएच्या माध्यमातून तत्पर आहे.परंतु माथेरानची शान समजले जाणारे घोडे हे त्या रस्त्यावरून घसरून पडतात अशी या अश्वपालकांची तक्रार आहे.
माथेरान मध्ये आजपर्यंत झालेल्या पर्जन्यवृष्टी मुळे जवळपास मातीच शिल्लक राहिलेली नाही माथेरानची ही तांबडया मातीची ओळख जवळजवळ संपुष्टात येत चालली आहे. ह्या मातीची धूप थांबविण्यासाठी आणि इथला एकंदरीत परिसर अबाधित ठेवण्यासाठी पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याला सनियंत्रण समितीची सुध्दा हरकत नाही.मागील काळात २००७ मध्ये अशाचप्रकारे गावाच्या मुख्य रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत होते त्यावेळी सुद्धा घोडे घसरून पडतील असे घाणेरडे राजकारण खेळले गेले आणि हा मुख्य महात्मा गांधी मार्ग अपूर्णावस्थेत राहिला त्यावेळेस नगरपरिषदेत कृती समितीची सत्ता अस्तित्वात होती.त्यामुळे त्यावेळी ज्याप्रमाणे अशा महत्त्वपूर्ण विकास कामांना खोडा घालण्यात आला त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा इथे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच राजकीय डावपेचांचा नाहक त्रास सर्वसामान्य लोकांना, व्यापारी वर्गाला आणि विशेष करून पर्यटकांना होत आहे.आगामी निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन केली पाहिजे यासाठी जो तो वेळप्रसंगी खालच्या थराला जाऊन सुध्दा राजकारण खेळत आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांचे, व्यापाऱ्यांचे, दुकानदार असो किंवा लहान मोठा स्टॉल धारक यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला बगल देऊन अशाप्रकारे गलिच्छ राजकारण केवळ माथेरान मध्येच पहावयास मिळते. त्यामुळे नक्कीच माथेरानचा विकास हा कायमस्वरूपी परिसरातील लोकांच्या होकारावर चालणार आहे की काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. जर असेच परिसरातील लोकांच्या नियंत्रणावर माथेरान मधील विकास कामे होणार असतील तर नक्कीच पुढील काळात या गावासाठी येथील गलिच्छ राजकीय खेळीमुळे हे गाव अधोगतीला जाईल यात शंकाच नाही.पूर्वीपासून विकास कामांपासून शापित असलेल्या या अगदी लहानशा गावात केवळ सत्तेसाठी आणि खऱ्या अर्थाने पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे गणितच इथल्या राजकीय मंडळींना ठाऊक आहे. त्यामुळेच जर येणाऱ्या पर्यटकांना उत्तम प्रकारे सोयीसुविधा, चालण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते उपलब्ध झाले नाहीत तर ह्या सुंदर पर्यटनस्थळाचा गोठा होण्यासाठी वेळ लागणार नाही. विकासात्मक कामासाठी वापरले जाणारे हे काहीअंशी का होईना ब्लॉकचे पर्यावरण पूरक रस्ते तग धरू शकतात परंतु हे ब्लॉकचे रस्ते नक्कीच कालबाह्य होण्याची चिन्हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.
स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम,यांसह अन्य अश्वपालक यांनी याबाबत आम्हाला सांगितले होते. त्यानुसार आम्ही एमएमआरडीए च्या अभियंत्यांना कळवून ज्या ज्या ठिकाणी घोडे घसरून पडतात त्याठिकाणी योग्य तो पर्याय उपलब्ध करावा. घोडा हे माथेरानचे प्रवासी वाहतूकीचे साधन असून या गावाची शान समजली जाते त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. ज्याठिकाणी घोडे घसरतात त्या भागातील ब्लॉक आम्ही काढण्यास सांगितले आहेत.
प्रसाद सावंत –बांधकाम सभापती माथेरान नगरपालिका
अति चढाव आणि उताराच्या जागेवरून जे ब्लॉक काढण्यात आले आहेत त्याजागी काहीतरी पर्याय उपलब्ध करून रस्ते पूर्ववत केले जाणार आहेत.
अरविंद धाबे –कार्यकारी अभियंता एमएमआरडीए