भाजपाने आगी लावण्याखेरीज काही केले नाही – ना.विजय वडेट्टीवार

0
105

म्हसळा : म्हसळ्यात मोटर सायकल रॅलीद्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्याचे मदत, पुनर्वसन आणि आपत्कालीन मंत्री नाम. विजय वाडेवट्टीवर यांचे स्वागत करण्यात आले.भाजपने देशातील काँग्रेसने उभारलेल्या अनेक प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू केलेला असताना एस.टी.महामंडळाच्या सरकारीकरणा साठीच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हे दुटप्पीपणाचे वागणे असल्याची जळजळीत टीका राज्याचे पुनर्वसनमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे रायगड संपर्कमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी करताना महामानवांच्या पवित्र भूमितील रायगड जिल्हा काँग्रेसमय करणार असल्याचा निर्धारही यावेळी ना.वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
म्हसळा तालुका काँग्रेस पक्षाच्या जाहिर मेळावा आणि आढावा बैठकीप्रसंगी ना.वडेट्टीवार यांच्यासमवेत रायगड प्रभारी चारूलता टोकस, श्रीरंग बरगे, प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रध्दा ठाकूर,महाड विधानसभा काँग्रेस नेते हनुमंत मो.जगताप, म्हसळा तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. मुईज शेख, सरचिटणीस रविंद्र दळवी, रफिक घरटकर, बाबाजन पठाण, बावा हुरजूक आदि मान्यवर उपस्थित होते.
आपल्या घणाघाती भाषणामध्ये ना.विजय वडेट्टीवार यांनी, सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले असे विचारणारे आता महागाई, धार्मिक तेढ, नफेखोरी आणि बेरोजगारीने त्रस्त झाले आहेत. हीच योग्य वेळ आहे काँग्रेसने काय केले सांगण्याची आणि केंद्रातील सरकार काय करीत आहे हे समजवून सांगण्याची. मोजक्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रोज एक तास घराघरात जाऊन संपर्क साधला तर संपूर्ण मतदार संघातील तब्बल २० पोलींग बूथपर्यंत अल्पावधीमध्येच काँग्रेसचे विचार पोहोचविता येतात. आता मोबाईलवरील सोशल मिडीयावरून मोदींची स्तुती करणाऱ्यांवर शिव्याशाप पडू लागले आहेत. कंगना राणावतसारख्या महिलेने स्वातंत्र्य भीकेमध्ये मिळालेले म्हणणे हा शहिदांचा अपमान आहे, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये कंगना राणावतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, अशी खरमरीत टीका करून काँग्रेसच्या ब्रिटीशांविरूध्दच्या लढाईच्या परंपरेत हौतात्म्य आहे आणि हे ज्यांचे फोटो लावतात ते माफी मागत होते, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.
म्हसळा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुक काळामध्ये काँग्रेसपक्षाची ताकद देण्याचे आवाहन ना.विजय वडेट्टीवार यांना करण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले कि बॅरिस्टर ए. आर.अंतुले, मधुकर ठाकूर आणि माणिकराव जगताप या स्वर्गीय नेत्यांच्या रायगड जिल्हयातील कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीमध्ये मोठया प्रमाणात ताकद देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी, रायगड जिल्हयातील काँग्रेस नेतृत्वामध्ये एकदिलाने काम करण्याची वृत्ती असताना अलिबाग पासून संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पक्षसंघटना वाढविणार असल्याचे सांगितले.सुरुवातीस म्हसळा तालुका काँग्रेस सचिव रविंद्र दळवी यांनी प्रास्ताविकामध्ये काँग्रेसपक्षाचे मतदार आणि कार्यकर्ते अद्याप ठाम असल्याचे सांगून आगामी नगरपंचायत तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.