Home ताज्या बातम्या सार्वजनिक बांधकाम खात्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ता रोकोचा दणका …।
नेरळ कळंब रस्त्याच्या कामाला सुरुवात
कर्जत : कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नादुरुस्त झालॆल्या नेरळ-कळंब रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरण या कामाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी साई मंदिर येथे तब्बल दीड तास रस्ता रोखून धरला आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. दरम्यान,मनसेच्या आंदोलनाला मोठे यश आले असून नेरळ-कळंब रस्त्याच्या डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. मनसेच्या आंदोलनाला स्थानिक रिक्षा चालक संघटना यांनी पाठिंबा रिक्षा वाहतूक बंद करून सहभाग नोंदवला.
आज सकाळी मनसेचे कार्यकर्ते पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे तालुका उपाध्यक्ष यशवंत भवारे, अकबर देशमुख ,राजेश विरले, नेरळ शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ, कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम, विधानसभा मतदारसंघाचे सचिव अभिजित पाटील, विभाग अध्यक्ष महेंद्र मोगरे, मंगेश गोमारे, समीर वेहले, विद्यार्थी संघटना तालुका उपाध्यक्ष सतीश कालेकर, आदी कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक मनसेचे कार्यकर्ते आणि नागरिक यांनी रस्ता रोको सुरु केला. दीड तास साई मंदिर येथे नेरळ- कळंब, नेरळ-कशेळे, नेरळ- पिंपळोली आणि पेशवाई रोड या रस्त्यांची वाहतूक बंद पाडली.
पुण्यावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रभारी उपअभियंता अक्षय चौधरी यांना पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांनी बोलावून घेतले. मात्र नेरळ येथे बारा वाजता पोहचलेले उपअभियंता चौधरी हे रस्ता रोको आंदोलनात यायला घाबरले आणि नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन बसले. शेवटी पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांनी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची समजूत काढून आंदोलन थांबवावे आणि पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा करावी अशी विनंती केली. त्यामुळे जिल्हा अध्यक्ष पाटील यांनी रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे सांगत आपल्या मनसेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी यांच्या उत्तरांवर मनसेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. शेवटी आजच रस्त्याच्या डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण कामाला सुरुवात होत आहे आणि तात्काळ काम सुरु करण्याचे आश्वासन दिले.