मुंबई – गोवा महामार्गावरील दाट धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने

0
163

नागोठणे : गुरुवारी सकाळी पहाटे पडलेल्या दाट धुक्यात संपुर्ण मुंबई- गोवा महामार्ग हरवला होता. जणु काही महामार्गावर धुक्याची चादर पसरली होती. या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे वाहतुक पुर्णतः धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे वातावरणातही काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने काही प्रमाणात थंडीची चाहूल निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वत्र धुके पडल्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर, ब्लॅंकेट, व चादरींचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे गुरुवार (दि.२५) रोजी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीस अनेक ठिकाणी वाहने चालवतांना अडथळे येत होते. सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्याचे प्रमाण एवढे होते की, वाहनचालकांना वाहन चालवतांना समोरचे ७ ते ८ फुट अंतरावरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करुन ठेवली होती. काही वेळाने धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच पुन्हा वाहतूक सुरू केली.
सद्यपरिस्थितीत सकाळी व रात्री वातावरणात थंड असते तर अनेक ठिकाणी धुके पडलेले असते. दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता असते. वातावरणातील या वारंवार बदलामुळे थंडी, ताप, खोकला अशा साथींच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची योग्य अशी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.