नवीन पनवेल : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विहिघर- कोप्रोली, नेरे रस्त्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसून येत आहेत. त्याचा मनस्ताप वाहन चालकांना होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पनवेल तालुक्यातील चिपळे -विहिघर, कोप्रोली -नेरे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते. याबाबत मनसे आक्रमक झाली होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर निकृष्ट दर्जाचा साहित्य वापरून ठेकेदाराने खड्डे बुजवले. त्यामुळे थोड्याच दिवसात येथे पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या ठेकेदाराने खड्ड्यांवर थुक पट्टी लावल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे खड्ड्यांमुळे वाहनांच्या देखील नुकसान होत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवून नवीन रस्ता तयार करण्याची मागणी केली जात आहे.