जासई,गव्हाण,वहाळ ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे कचरा- डेब्रिज टाकण्यात येणाऱ्या अवजड वाहनांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश

0
301

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर डेब्रिज माफियांचे धाबे दणाणले !

उरण : मुंबईतील जासई – गव्हाण – वहाळ ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे हजारो टन कचरा- डेब्रिज टाकण्यात येत असलेल्या अवजड वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.यामुळे डेब्रिज माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
मुंबईतून दररोज हजारो टन कचरा -डेब्रिज जासई-गव्हाण-वहाळ ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे टाकण्यात येत आहे.या डेब्रिजमध्ये गटारातील घाण, मृत पशुपक्षी, प्राण्यांच्या अवयवांमुळे हवेतही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने वायु प्रदुषणात भर पडली आहे.परिसरात वाढते वायु प्रदुषण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील दररोज येणारा हजारो टन कचरा डेब्रिज उलवे नोड परिसरात आणखी बऱ्याच ठिकाणी हा धोकादायक डेब्रिज कचरा टाकण्यात येत आहे.यामुळे खाड्याही बुजविण्यात आल्या आहेत.बामणडोंगरी खाडीत तर चक्क खारफुटींवर हा कचरा टाकून कांदळवन नष्ट करण्यात येत आहेत.तर काही ठिकाणी डेब्रिज कचरा धुतला जातो आहे. डेब्रिज कचरा धुतलेले दूषित घाण पाणी थेट समुद्र, खाड्यात सोडले जात आहे.
या दुषीत पाण्यामुळे समुद्र, खाड्याही प्रदुषित झाल्याने येथील स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.या गंभीर प्रश्नांबाबत येथील ग्रामपंचायतीनी सिडको, पोलिस आणि संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याकडे लक्ष देण्याची सुबुद्धी कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांना अद्यापही सुचलेली नाही.
या गंभीर समस्येला दैनिक रायगड नगरी ने वाचा फोडली होती. त्यानंतर सदर वृत्ताची दखल घेऊन मुंबईतील जासई-गव्हाण-वहाळ ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे कचरा- डेब्रिज टाकण्यात येत असलेल्या अवजड वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी पोलिसांसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे डेब्रिज माफियांचे धाबे दणाणले आहेत.