भाजप नेते माजी आमदार तरविंदरसिंह मारवा यांचा पनवेलमध्ये काँग्रेसकडून निषेध

0
6

पनवेल:
दिल्ली येथील भाजप नेते व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावर तरविंदरसिंह मारवा आणि भाजपच्या विरोधात शुक्रवारी पनवेलमध्ये (दि.१३ सप्टेंबर) पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कॉंग्रेस भवनाबाहेर मारवा यांचा फोटो चिखलात तुडवून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
राहुल गांधी यांच्या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारखेच मारू, अशी धमकी भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवा यांनी दिली आहे. ही धमकी देणाऱ्या भाजपच्या दिल्लीतील माजी आमदार तरविंदरसिंह मारवाला अटक करुन भाजपने देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मारवा व भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गांधी घराण्याने देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्याच गांधी घराण्यातील राहुल गांधी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असूनही भाजपचे शिर्ष नेतृत्व कारवाई करीत नाहीत त्यामुळे आज देशात सर्वसामान्य नागरिकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी व्यक्त केली. तर राहुल गांधी यांना भाजप नेत्याकडून जीवे ठार मारण्याची धमकी देणे म्हणजे हे खऱ्या अर्थाने कमकुवत मनोवृत्तीचे लक्षण आहे. परंतु काँग्रेस महासागर असून कितीही दगड फेकले तरी ते सामावून घेण्याची क्षमता काँग्रेस मध्ये असल्याची प्रतिक्रिया कार्याध्यक्ष श्रुती म्हात्रे यांनी व्यक्त केली.
भाजप आणि आरएसएसला केवळ चांगल्या माणसांचा बळी घ्यायचा असल्याची टीका महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे म्हणाले, भाजप नेते मारवा हे देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत असूनही भाजपकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे एकप्रकारे भाजप त्यांना पाठीशी घालत आहे. तर राहुल गांधी हे शहिदांच्या परिवारातील एक आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देताना मारवा यांना लाज वाटायला हवी अशी टीका किरण तळेकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, मल्लिनाथ गायकवाड, श्रुती म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे, शशिकला सिंह, ऍड.अरुण कुंभार, किरण तळेकर, भारती जळगावकर, सुधीर मोरे, जेम्स जोन्स, सुरेश पाटील, राकेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.