युवानेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, ॲड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचे अर्ज दाखल
पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीच्या वतीने आज (बुधवार, ४ मार्च) अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे युवानेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर तसेच शिवसेनेचे ॲड. प्रथमेश सोमण यांनी आपले अर्ज महापालिकेचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे दाखल केले. महायुतीचे सर्व उमेदवार अनुभवी व अभ्यासू आहेत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. 
यावेळी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक ऍड. प्रकाश बिनेदार, शिवसेना नेते रमेश गुडेकर, भाजपचे शहर अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंझारराव, युवा नेते संजय जैन यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 
नुकताच झालेल्या पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पुन्हा एकदा भाजप महायुतीने वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपने ५५, शिवसेनेने २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवत एकूण ५९ जागांसह पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली. त्या अनुषंगाने महापौरपदी नितीन पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील विराजमान झाले. ५९ जागांवर विजय मिळाल्यामुळे सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवक पदे महायुतीच्या वाट्याला आली आहेत. त्यामध्ये सभागृहाचा अनुभव व अभ्यास असलेले परेश ठाकूर, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, ॲड. प्रथमेश सोमण, आणि दिनेश खानावकर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. निर्वाचित ५९ आणि स्वीकृत पाच अशी एकूण ६४ संख्याबळ महायुतीची होणार आहे.