आर्थिक व दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना पनवेल तहसीलदार कार्यालयाकडून एप्रिल व मे महिन्याच्या अर्थसहाय्याचे वाटप

399
975

सुमारे 4 हजार 693 लाभार्थ्यांना 78 लाख 99 हजार 800 रुपयाच्या अर्थसहाय्याचे वाटप

पनवेल : कोरोना काळातील वाढत्या निर्बंधामुळे तसेच सततच्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुक्यातील आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याकरिता पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्याच्या अर्थसहाय्याचे एकाच वेळी वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ब्रेक द चैन अंतर्गत घालण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे आर्थिक व दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संजय गांधी निराधार योजनेतील 1796 लाभार्थ्यांना 38 लाख 60 हजार 400 रुपये, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील 1998 लाभार्थ्यांना 36 लाख 22 हजार 400 रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील 828 लाभार्थ्यांना 3 लाख 74 हजार 400 रुपये तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतील 71 लाभार्थ्यांना 42 हजार 600 रुपये असे एकूण 4693 लाभार्थ्यांना 78 लाख 99 हजार 800 रुपयांच्या अर्थसहाय्याचे वाटप संबंधित लाभार्थ्यांच्या वैयक्तीक बँक खात्यांवर जमा करण्यात आले. कठीण काळात दोन महिन्याचे अर्थसहाय्य एकत्रितरित्या मिळाल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांनी देखील पनवेल तहसीलदार कार्यालयाचे आभार व्यक्त केले.