आरटीओ ने ई रिक्षाचे दर निश्चित करावे : स्थानिकांची मागणी

0
7

माथेरान :  श्रमिक हातरीक्षा चालकांच्या ताब्यात ई रिक्षा द्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या हेकेखोर वृत्तीमुळेच  सध्या पायलट प्रोजेक्टवर केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी या समितीने ई रिक्षाचा ठेका दिलेला असून दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान प्रति माणसी ३५ रुपये दर आकारण्यात येत आहे.सहा ते सात मिनिटांत हे अडीच किलोमीटर अंतर ई रिक्षाच्या प्रवासासाठी लागते.तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी फक्त पाच रुपये इतका माफक दर ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे काही महिने येथील शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाला दस्तुरी माथेरान दस्तुरी या प्रवासासाठी दर दिवसाला केवळ पाच रुपयांत मासिक पास देण्यात आले होते.ज्याना लाख रुपये मासिक पगार मिळतो अशा शासकीय अधिकारी वर्गाला ही सवलत देण्यात आल्यामुळे अनेकदा ३५ रुपये दर भरणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु या शासकीय अधिकारी वर्गाला नागरिकांच्या तक्रारी वरून या सुविधे पासून बंद करण्यात आले आहे.ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना इथे शासकीय खोल्या उपलब्ध आहेत अशी मंडळी सुध्दा नेरळ अथवा कर्जत याठिकाणी राहून ई रिक्षाच्या साहाय्याने नोकरीसाठी येतात. तर येथील  निमशासकीय कर्मचारी सुध्दा आपल्या स्वतःच्या खोल्या असताना माथेरान परीसरात वास्तव्यास आहेत.काही दिवसांनी जवळपास वीस नवीन ई रिक्षांची सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी आरटीओ ने या ई रिक्षाचे परवडणारे दर निश्चित केल्यास सर्वाना सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी जोर धरू लागली आहे.